Tuesday, May 08, 2007

वाहनचालकांचे किस्से

"पुण्यात जो गाडी नीट चालवू शकतो, तो जगात कुठेही चालवू शकतो,' असं बऱ्याचदा म्हटलं जातं. वाहनांची वाढती संख्या, लहान रस्ते या सर्वांना तोंड देत पुणेकरांना कितीही गर्दी असली तरी गाडी चालवण्याची कसरत करावीच लागते. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही यथातथाच आहे. वाहन चालवताना अनेकदा लहानमोठे वादावादीचे प्रसंगही येतात. त्यातलेच काही संकलित केलेले किस्से. ........
-------------------------------------------------------------------
मी आणि माझा मित्र एकदा बाईकवरून चाललो होतो. रस्त्यावर आमच्या पुढेच एक प्रीमियर पद्मिनी होती. अचानक पद्मिनी चालवणाऱ्या माणसाने उजवीकडे गाडी वळवली. तेही कोणताही सिग्नल न दाखवता! आम्ही त्या गाडीवर जाऊन धडकलो. कुणाला काही लागलं नाही, पण आमच्यात झालेला संवाद असा..
आम्ही ः काय रे, वळताना इंडिकेटर देता येत नाही का?
गाडीवाला ः काय राव तुम्ही पण! अख्खी गाडी वळताना तुम्हाला दिसली नाही, मग इंडिकेटर कसा दिसला असता?
यावर अर्थातच आम्ही निरुत्तर झालो.
-------------------------------------------------------------------
एक वयस्कर गृहस्थ एम-८० वरून चालले असताना बाईकवरून चाललेल्या एका कॉलेजकुमाराने त्यांना जोरात हॉर्न वाजवून ओव्हरटेक केला. वर "कशी जिरवली' अशा आविर्भावात तो जोरात पुढे निघून गेला. मात्र थोडं पुढे गेल्यावर तो कशावरून तरी घसरला आणि बाईकसकट रस्त्यावर खाली पडला. हे आजोबा मागून येतच होते. तो पडल्याचे पाहताच ते त्या मुलाच्या जवळ जाऊन हळूच म्हणाले, ""बाळा, कितीही घाई केली, तरी गाडीचं मागचं चाक पुढच्या चाकाच्या पुढे कधीच जात नाही. पुढच्या वेळी हे लक्षात ठेव.''
-------------------------------------------------------------------